औरंगाबाद - राज्यातील सर्वाधिक उंचीच्या औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन नवीन वाद निर्माण झाला ( Aurangabad Shivaji Maharaj Statue ) आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या हस्ते आज (18 फेब्रुवारी) रात्री 12 वाजता पुतळ्याचे लोकार्पण करण्याची घोषणा मनपातर्फे करण्यात आली. मात्र, त्याला आता शिवजयंती उत्सव समितीने विरोध दर्शवत वेळ बदलण्याची मागणी केली आहे. त्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे.
क्रांती चौक येथील छत्रपती महाराज महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पुर्वी करण्याची मागणी शिवप्रेमींची होती. रात्री 12 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सोहळ्यात सहभागी होतील, असे मनपाकडून सांगण्यात आले.
परंतु, कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले असताना रात्री 12 चा मुहूर्त कसा काढला, अशी टीका सुरु झाली आहे. महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे याकरिता अनेक वर्षांपासून वाट पाहावी लागली. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी व्हावे, अशी इच्छा शिवप्रेमींची आहे. रात्री 12 वाजता मराठवाड्यातील शिवप्रेमी सहभागी होण्यास अडचणी आहेत. त्यात रात्री 10 नंतर वाद्य वाजवण्यास आणि आतिषबाजी करण्यास मनाई आहे.
त्यामुळे रात्री 12 ऐवजी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता पुतळ्याचे लोकार्पण व्हावे. त्यात महाराजांच्या वंशजांना बोलवावे, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केल्याची माहिती, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, रात्री 12 वाजता अनावरण ठेवल्याने शिवभक्त संतप्त झाले आहेत. आम्हाला मुहूर्त नकोय. सर्वांना सोयीस्कर होईल, असा वेळ हवा आहे. शिवसेनेने एक राजा एक जयंती मान्य करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा - Narayan Rane Critics on Sanjay Raut : संजय राऊत यांना घाम का फुटत होता - नारायण राणे