औरंगाबाद - आरोग्य खात्यातील रिक्त जागा न भरल्याबाबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या माध्यमातून, राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या संचालिका साधना तायडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याच्या आरोग्य खात्यातील महत्त्वाची पदे रिक्त
राज्याच्या आरोग्य खात्यातील अनेक महत्त्वची पदे रिक्त असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात मान्य केले आहे. राज्याच्या आरोग्य खात्याच्या संचालकांची दोन पैकी एक जागा रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पैकी तीनही जागा रिक्त आहेत. सहसंचालकांच्या दहा पैकी आठ जागा रिक्त आहेत. उपसंचालकांच्या 25 पैकी 22 जागा रिक्त आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकाच्या 683 पैकी 296 जागा रिक्त आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या 287 जागांपैकी 205 जागा रिक्त आहेत. रोग स्पेशलिस्ट पदाच्या 565 पैकी तब्बल 400 जागा रिक्त आहेत. तर इतर जीआरडीच्या चार हजार जागा शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोना काळात या रिक्त जागांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वढला असल्याचे समोर आले आहे.
रिक्त जागा भरण्यासाठी रोड मॅप सादर करण्याचे आदेश
या सगळ्या प्रकारामुळे औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी रोड मॅप सादर करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. तर राज्य सरकारकडून रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत 29 जूनला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. केवळ औरंगाबाद आरोग्य खात्याच्या सर्व मिळून 2 हजार 48 जागा रिक्त आहेत. याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका दाखल करून स्वतः हा खटला लढायला सुरुवात केली आहे. कोर्टाने फक्त औरंगाबाद पुरता हा विषय न ठेवता संपूर्ण राज्याची माहिती मागवली होती. त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने आरोग्य यंत्रणा रामभरोसे आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा - परमबीर सिंहांची तक्रार फक्त भ्रष्टाचाराबाबत; फोन टॅपींग, बदल्या प्रकरणाशी संबंध नाही; राज्य सरकारचा दावा