औरंगाबाद - लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता संजय राजाराम पाटील याच्याकडे मोठे गभाड आढळून आले. घरासह बँक खात्यांची एसीबीने झाडाझडती घेतली. यात 85 तोळे सोन्याचे दागिने व 27 लाख 65 हजारांची रोकड आढळून आली आहे. ही केवळ जंगम मालमत्ता असून, स्थावर मालमत्तेची मोजणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक मारुती पंडित यांनी दिली.
चार वर्षांपूर्वी मुकुंदनगरातील वाय.पी. डेव्हलपर्सला मारुती मंदिराच्या सभागृहाचे आमदार निधीतील काम मिळाले होते. चार लाखांच्या कामाचे सहा लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्या-घेण्याचे ठरले होते. त्याचा पहिला हप्ता घेताना एसीबीने 40 हजार रुपये स्विकारताना संजय पाटीलला पकडले होते. 12 मार्चला ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर पाटीलच्या घराची झडती घेतली असता 18 तोळे सोने व 1 लाख 61 हजारांची रोकड आढळली होती. तर, एका बँकेच्या लॉकरमध्ये तब्बल 672 ग्रॅम सोने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपये आढळले. हा सर्व मुद्देमाल एसीबीने जप्त केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.