औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. मात्र पहिल्या दिवशी नागरिक रस्त्यावर आल्याचं दिसून आलं. त्यामुळे लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे कोरोना आटोक्यात येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अत्यावश्यक गरजेच्या नावाने नागरिक रस्त्यावर-
राज्यात संचारबंदी लागू करत असताना अत्यावश्यक सुविधा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मेडिकल, किराणा, दूध, फळ या सर्व गोष्टी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हॉटेल चालकांना घरपोच सेवा देण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. नागरिकांच्या गरजेसाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली असली. तरी देखील नागरिक त्याचा गैरफायदा घेताना दिसून येत आहेत. त्यामुळेच सकाळपासून कोणत्याना कोणत्या कारणाने रस्त्यावर नागरिक वावरत असताना पाहायला मिळत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने कडक निर्बंध लावले आहेत. तरी देखील काही प्रमाणात सूट नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवताना पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आडवून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. असा असलं तरी नागरिक अत्यावश्यक सेवेच कारण देत असल्याने पोलिसांमध्ये कारवाई करण्याबाबत अनेक संभ्रम दिसून येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालावा कसा, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसात नागरिक रस्त्यावर येतच राहिले तर राज्य सरकारला अत्यावश्यक सेवा देखील बंद करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाखांच्यावर-
गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये एकूण रुग्णसंख्या एक लाखाच्यावर गेली असून सद्यस्थितीत 1,03,254 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. त्यापैकी 85,400 उपचार घेऊन घरी गेले असून आत्तापर्यंत 2052 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 15,802 इतकी झाली आहे.
हेही वाचा- देशांतर्गत विमान प्रवासात आजपासून खानपान सुविधा बंद