औरंगाबाद - पैठण येथील जायकवाडी धरणाजवळ पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाची भूमिका जाहीर होईपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु, या शेतकऱ्यांनी बसून घोषणा देण्याऐवजी धरण परिसर स्वच्छ करत अनोखा संदेश दिला आहे.
आपेगाव हिरडपुरीत पाणी सोडावे या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचे जायकवाडी धरणाखाली गोदावरी पात्रात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत चर्चा झाली. पण, महाजन मुंबई बाहेर असल्यामुळे पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली नाही. मुंबई मध्ये आल्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. मात्र, त्यावर आमचे समाधान नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
अर्धा टीएमसी पाणी सोडले तर या भागातील पशूंच्या चाऱ्याची समस्या मिटणार आहे. अनेक चारा छावण्यांना चारा उपलब्ध होणार आहे. भागातील ७० हजार लोकांच्या पाण्याची समस्या मिटणार आहे. त्यामुळे आजची रात्र सुद्धा शेतकऱ्यांना गोदावरी पत्रात काढण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक घोषणाबाजी करताना न्याय मिळेपर्यंत आरडा-ओरड करतात. मात्र, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत असताना अनोखा उपक्रम राबवला. गोदाकाठी लोक दहाव्याचा विधी करण्यासाठी येतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आंदोलकांनी स्वच्छ केला आहे. जायकवाडी धरण परिसरात जवळपास २०० आंदोलकांनी स्वच्छता मोहीम राबवली.