औरंगाबाद - कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे यंदा 31 फुटी भव्य इकॉग्रीन गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. सिडको एन 6 भागात ही गणेश मूर्ती साकारण्यात आली असून, हा गणेशा नागरिकांना कोरणामुक्त राहण्याचा संदेश देत आहे. इतकेच नाही तर कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद नगरीत आपले स्वागत असेल. असा संदेशही या बाप्पाच्या माध्यमातून आयोजकांनी दिला आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी -
नारळाच्या झाडाच्या पानांपासून साकारला भव्य बाप्पा
इको बाप्पा साकारताना पर्यावरणपूरक अशा बाबींचा उपयोग करण्यात आला. पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा कुठल्याच वस्तूंचा वापर न करता हा विशाल बाप्पा साकारण्यात आला आहे. हा बाप्पा साकारण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा अवधी लागला असून, गणपती तयार करण्यासाठी आणि सजावटीसाठी नारळाच्या झाडांचे पाने यांची मोठी चटई तयार करून, त्यावर फुले लावण्यात आली आहे. गणपती उठावदार दिसावा याकसाठी कागदी प्लेट, वाट्या, सहाशे द्रोण वापरण्यात आले आहे.
कोरोनाबाबत जनजागृती करत दिला संदेश
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन ही लाट थांबवणे शक्य आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा असा संदेश देणारे उंदीर मामा गणपती बाप्पा जवळ लावण्यात आले आहेत. या उंदीर मामांच्या हातात कोरोना लस, सॅनिटायजर, मास्क देऊन त्यांचा वापर किती महत्वाचा आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. इतकेच नाही, तर दोन उंदीर मामांमध्ये अंतर ठेवून आम्ही सोशल डिस्टन्स पाळतो, तुम्ही पण पाळा हा संदेश देखील आयोजकांनी दिला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाचे नियम गणेशभक्तांनी पाळावे यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवल्याचे कुलस्वामीनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे आणि अलका कोरडे यांनी सांगितले.
जागतिक वारसांचा केला प्रसार
औरंगाबादला ऐतिहासिक अशी ओळख आहे. जगविख्यात अजिंठा-वेरूळ लेणीसह अनेक पर्यटनस्थळ जिल्ह्यात आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात ही पर्यटन स्थळ बंद होती, आता काही नियम अटींना अधीन राहून ऐतिहासिक स्थळ पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असली, तरी आजही अनेक पर्यटक इथे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करून या आजाराला हरवल्यास निश्चित आपण औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देऊन, आनंद घेऊ शकता. त्यावेळी आपले निश्चितच स्वागत असेल असा संदेश देखील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.
यांनी घेतले परिश्रम
21 फुटी इको गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष विलास कोरडे यांनी संकल्पना मांडली. गणेश निर्मित करण्यास अलका कोरडे, पल्लवी कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, अभिराज कोरडे, अच्युत कुलकर्णी, चंद्रमुखी जायभाय, ज्ञानेश्वर साखरे, अनिल गावंडे, प्रल्हाद गायकवाड, खंडू गुंजाळ, अनिल शिसोदे, अमित केसाळे, आतिक पठाण, बाळू भालेराव यांनी परिश्रम घेतल्याचे कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.