औरंगाबाद- पक्ष सोडून जाणाऱ्यांनी लगेच जावे, जाणाऱ्या लोकांमुळे पक्ष स्वच्छ होत असून त्यांची जागा घेण्यासाठी अनेक जण तयार आहेत, असे वक्तव्य काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी औरंगाबादेत केले. सचिन सावंत यांनी औरंगाबाद येथील काँग्रेस भवन येथे विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी त्यांना माध्यामांशी बोलताना हे वक्तव्य केले.
सांवत पुढे म्हणाले, की भाजप संवाद यात्रा काढत आहे. मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढताना रणगाडा मागवून घ्यावा, कारण राज्यातील रस्ते इतके खराब आहेत की मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ शकतो, असा टोला सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर जाण्यासाठी काही मुद्दे राहिलेले नाहीत. राज्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, जनतेची दिशाभूल करण्यात आली. लोकसभेत भाजप पाकिस्तान आणि सैन्याची कारवाई या मुद्द्यांवर निवडणूक जिंकले. मात्र, राज्यात हे मुद्दे कामाला येणार नाहीत, असा टोलाही सावंत यांनी लावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले. तसेच वंचित आघाडीचा बुरखा फाटला असून भाजपचा पराभव करण्याऐवजी काँग्रेसचा पराभव करण्याकडे त्यांचा कल आहे. प्रकाश आंबेडकरांवर ही जबाबदारी आहे. अशी टिका त्यांनी केली. तसेच सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. याविषयी प्रकाश आंबेडकरांनी गांभीर्याने विचार करायला हवा. ही निवडणूक हुकूमशाहीच्या विरोधात आहे. योग्य भूमिका घेतली नाही तर इतिहासात त्यांना लोक माफ करणार नाही. ते आले नाही तरी संपूर्ण ताकदीने आम्ही लढू. आम्हाला यश मिळेल. असे देखील सचिन सावंत यांनी सांगितले.