औरंगाबाद - राज्यात इंधन दरवाढीने कळस गाठला आहे. केंद्र सरकार या दरवाढीला कारणीभूत असल्याचा आरोप करत औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. क्रांतीचौक पेट्रोल पंप येथे 'विश्वासघात' आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
क्रिकेट बॅट उंचावून साजरे केले पेट्रोलचे शतक
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल आणि गॅस वाढलेले दर पाहता औरंगाबाद येथील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारचा निषेध करणारी फलके हातात घेऊन निदर्शने केली. क्रिकेटमधील शतकवीर ज्याप्रमाणे शंभर धावांची सलामी देतो, त्याचप्रमाणे पेट्रोलचे दर शंभर रुपये लिटर झाल्याची सलामी पेट्रोलच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याने दिली. एक एक धाव घेत शंभरी पार केल्याप्रमाणे रोज एक-एक रुपयाने पेट्रोलची दर वाढ करत शंभरी पार झाली आहे. खेळाडूचे शतक पूर्ण झाल्यावर चाहत्यांना आनंद होतो, मात्र या शंभरीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
लवकरच देशभर आंदोलन
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत जात आहे. इंधनदर नियंत्रित करण्याचे आश्वासन देत भाजपाने मत घेतली. मात्र देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पेट्रोलने शंभरी गाठली आहे. ही दरवाढ नियंत्रणात आणली नाही तर काँग्रेसच्यावतीने देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा शहर युवक काँग्रेसने दिला आहे.