औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले आहे. दारू पीत असताना झालेल्या वादातून दोघांनी एकाचा खून केल्याचे समोर आले आहे. भारत निवृत्ती आल्हाड (वय २७, रा. सिरेसायगाव गंगापूर औरंगाबाद) असे मृताचे नाव असून, अमोल गणेश घाटोळे (वय - २१), राकेश सुरेश चौधरी (वय - २१) अशी आरोपींची नावे आहेत.
नांदेड रोडवर गायके यांच्या शेतात ३० ऑक्टोबर २०१८ ला एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. प्रथमदर्शनी मृताच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या. त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, डॉक्टरांचा अभिप्राय आणि शवविच्छेदन अहवालावरून १५ जुलै २०१९ला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी स्वतः हातात घेतली. आरोपी अज्ञात असल्यामुळे घटनास्थळाचा अभ्यास, गुप्त बातमीदार यांच्यासह घटना घडल्यानंतर हद्दीतून बाहेर स्थायिक झालेल्या लोकांच्या यादीचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली.
तपासात मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा अमोल गणेश घाटोळे, राकेश सुरेश चौधरी यांनी केल्याची माहिती समोर आली. त्यांच्या शोधासाठी पुण्याला एक पथक पोलिसांनी रवाना केले. तिथून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्याना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी राकेशचा मोबाईल विक्री करण्यासाठी दोघे युपी ढाब्याजवळ गेले. तिथे मोबाईल विकत घेण्यासाठी भारत आला. २५०० रुपयांमध्ये मोबाईलचा सौदा ठरला. भारतने पैसे काढण्यासाठी रांजणगाव जवळील एटीएमवर नेले. तिथे भारतने एटीएममधून ४००० रुपये काढले. त्यातले २५०० रुपये राकेशला दिले. नंतर भारतने तिघांसाठी दारू आणि चकणा विकत आणला, तिथून तिथे घाणेगाव रोडवर एका शेतात दारू पीत बसले. अचानक भारतने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भांडणात राग अनावर झाल्याने अमोल आणि राकेशने डोक्यात दगड घालत भारतला ठार मारले आणि घटनास्थळावरून निघून घरी गेले. पाच-सहा महिने घरीच राहिल्यानंतर ते पुण्याला स्थायिक झाले. तिथे ते मजूर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोनि मधुकर सावंत करत आहे. या कामगिरीमध्ये पोनि मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौतम वावळे, पोह वसंत शेळके, खय्युम पठाण, सुधीर सोनवणे, रेवणनाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, कोलीमी, बंडू गोरे, प्रदीप कुटे, दीपक मतलबे आदी सहभागी होते.