औरंगाबाद - कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत होते, मात्र काही दिवसात परिस्थिती आटोक्यात येत येत आहे. मात्र औरंगाबाद शहरावर म्यूकरमायकोसिस या आजाराचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे. एक एप्रिलपासून ते 15 एप्रिल या काळात या आजाराचे 201 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत यातील धक्कादायक बाब म्हणजे या पैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या लाटेनंतर मोठा परिणाम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून आले गंभीर रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात औषधांचा वापर केला जात आहे. त्याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहे. उपचार घेतल्यानंतर काही दिवसातच बुरशीजन्य आजार म्हणजेच म्यूकरमायकोसिस आजार दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराने कोरोनाइतकीच चिंतेत भर पाडली आहे. सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बाब म्हणजे हा आजार खूप खर्चिक आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून उपचारासाठी काही पॅकेज देण्यात आले, मात्र ते कमी आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांसमोर आजाराबाबत आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त व्यक्तींना हा आजार होत असून पुढील पंधरा ते वीस दिवसमध्ये या आजाराची मुख्य लक्षणे दिसून येतात. लक्षण आढळल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे, असे मत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केले.
आतापर्यंत 180 रुग्ण झाले बरे
खासगी रूग्णालयातून पालिकेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमजीएम रुग्णालयात 76, एशियन हॉस्पिटलमध्ये 24, कमलनयन बजाज रुग्णालयात 5, धूत रुग्णालयात 3, अपेक्स रुग्णालय 43 तर घाटी रुग्णालयात 50 रुग्ण मागील दीड महिन्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टेरॉइडच्या रुग्णांची संख्या 148 इतकी आहे. एकाच रुग्णाला एकापेक्षा जास्त आधार असलेल्यांचा समावेश यात आहे. यात 180 रुग्ण उपचार घेऊन काही परत आली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
मनपा घेणार रोज अहवाल
मागील एक वर्षापासून शहरात कोरोनासोबतच सारी आजाराने देखील शिरकाव केला होता. तेव्हापासून पालिकेने खासगी रुग्णालयांकडून सारीबाबतची माहिती रोजच्या रोज मागवली होती. त्याबरोबरच आता पालिकेने सर्व रुग्णालयांची बैठक घेऊन त्या बैठकीत त्यांच्याकडे दाखल होत असलेल्या म्यूकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची माहिती रोज कळवणे बंधनकारक केले असल्याची माहिती समोर आली आहे.