अमरावती : "स्वच्छ सुंदर आणि हिरवी अमरावती" असे अमरावती महापालिकेचे ब्रीदवाक्य असले तरी अमरावती शहर हवे तितके स्वच्छ आणि सुंदर नसले तरी अमरावती शहर आणि शहरालगतचा परिसर हिरव्यागार वृक्षांनी भरला असून, सध्या कडाक्याच्या उन्हात शहरात लावलेले नवे वृक्ष जगावे, वाढावे यासाठी अमरावती शहरातील वृक्षप्रेमी स्वतः या झाडांचे संगोपन करण्यास धावपळ करीत आहेत. शहराच्या विविध भागांत वृक्षांना सकाळी आणि सायंकाळी अनेक अमरावतीकर वृक्षप्रेमी पाणी देताना दिसत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात दिले जाते झाडांना पाणी : अमरावती रेल्वे स्थानक परिसरात नव्याने 60 ते 70 वृक्ष लावण्यात आली आहेत. ही झाडे बर्यापैकी वाढली असताना कडाक्याच्या उन्हामुळे अनेक झाडांवरील पाने जळायला लागली आहे. अमरावती महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या दुभाजकामध्ये असणाऱ्या झाडांना पाणी दिले जाते. मात्र, महापालिका प्रशासन आपल्या प्रयत्नात काहीसे अपुरे पडत असल्यामुळे अमरावती रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या चाळीस ते पन्नास नव्या झाडांना वृक्षप्रेमींच्या वतीने नियमित पाणी दिले जात आहे. अनेक वृक्षप्रेमी सकाळीच रेल्वे स्थानक परिसरातील झाडांना पाणी देताना दिसत असून, काही मंडळी भर दुपारीसुद्धा या परिसरातील झाडांना पाणी देत आहे.
छत्री तलाव परिसरात वृक्षसंवर्धन चळवळ : छत्री तलाव परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात फिरायला जाणारे अमरावतीकर या भागात असणाऱ्या झाडांचे संगोपन करण्याला अतिमहत्त्व देत आहेत. या भागात असणाऱ्या तलावाचे पाणी तसेच परिसरात मंदिरालगत असणाऱ्या हाफ सी च्या पाण्याद्वारे वृक्षप्रेमी झाडांना पाणी देत आहेत. अनेकांनी आपल्या घरून आणलेल्या पाण्याचा कॅन याच परिसरात ठेवले असून, सकाळी आणि सायंकाळी हापसीवरून पाणी भरल्यावर वृक्षप्रेमी या भागात असणाऱ्या विविध झाडांना पाणी देत आहेत.
पुरुषांसोबत पक्ष्यांचीसुद्धा काळजी : छत्री तलाव परिसरात अनेक वृक्षांवर पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी जलपात्र लावण्यात आले आहे. वृक्षांना पाणी देण्यासोबतच पक्ष्यांची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी या जलद पात्रांमध्येसुद्धा पाणी टाकले जाते. सध्या उन्हाचा पारा चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, या परिसरात असणाऱ्या विविध पक्ष्यांनाही वृक्षांप्रमाणे पाणी मिळावे याची काळजी पर्यावरणप्रेमी घेत आहेत.
झाडांना पाणी देण्यासाठी आवाहन : अमरावती शहरातील व्यापारी प्रतिष्ठानसमोर असणाऱ्या सर्व लहान-मोठ्या एका तरी झाडाला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडल्यावर पाणी द्यावे, तसेच सायंकाळीसुद्धा एका झाडाला तरी पाणी टाकावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : Amravati Unseasonal Rain : अमरावतीत अवकाळी पाऊस, नागरिकांची तारांबळ; दीक्षांत समारोहाचा मंडपही कोसळला