अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत 90 वर पोहोचली आहे. 3 एप्रिलला एक मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे अमरावतीत पहिल्यांदा समोर आले होते. गुरुवारपर्यंत अमरावतीत कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 13 झाली आहे.
गुरुवारी शहरातील खडकरी पुरा परिसरातील 28 वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेला कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तसेच कोव्हिड रुग्णालयात 44 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
बुधवारी दोन आरोग्य कर्मचारी कोरोनाबधित असल्याचे समोर येताच गुरुवारी डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रशिक्षण संस्था प्रबोधिनी येथील दोघांना कोरोना असल्याचा अहवाल आल्याने 68 जणांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. एकूण अमरावतीत कोरोना हळूहळू शतकाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी अमरावती शहरात नागरिकांची स्वॅब तपासणी मोहीम नव्याने राबवली जाणार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी अमरावतीकरांना केले आहे.