अमरावती - माजी राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील दमदार नेता अशी ओळख असणारे डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसबाहेर एक तप घालवून शनिवारी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या या भूमिकेबाबत अमरावती शहर काँग्रेसमध्ये उत्साह असताना भाजपने मात्र सडाडून टीका केली आहे.
'आमदार असते तर भाजपाला सोडले असते का?' -
डॉ. सुनील देशमुख यांच्या पक्ष सोडण्यावर भाजपाचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी सडकून टीका केली आहे. डॉ. सुनील देशमुख हे 2014 मध्ये भाजपात का आले, असा प्रश्न त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना उपस्थित केला. तसेच देशमुख हे सात वर्ष भाजपात होते. दरम्यान, त्यांनी 2019 मध्ये भाजपा तिकीटावर निवडणूकही लढवली. मात्र, 2019 ची निवडणूक जर ते जिंकले असते, तर त्यांनी भाजपा सोडली असती का, असा प्रश्नही पातूरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांची वैचारिक प्रतिबद्धता आणि कॉंग्रेस विचारसरणी केवळ मीडियाला दाखवण्यासाठी असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना त्यांनी 'भाजपा आज जगातील क्रमांक एकच राजकीय पक्ष आहे. देशमुख यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही. आज सुनील देशमुख यांच्या जागेवर येण्यासाठी दोन-तीन जण रांगेत आहेत' असेही म्हटले.
'ही भाजपाच्या मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी गद्दारी केल्यासारखी'-
अतिशय बिकट परिस्थितीत काँग्रेसने डॉ. सुनील देशमुख यांना पक्षातून काढले होते. त्यावेळी भाजपाने त्यांना मदतीचा हात दिला. 2014 मध्ये भाजपाने आपले जुने कार्यकर्ते डावलून त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. तसेच त्यांना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष पदही दिले. त्यासोबतच सिंचन महामंडळावरही त्यांना संधी दिली. भाजपाने त्यांच्यावर इतका विश्वास टाकला असताना 2019 च्या निवडणुकीत पराभव होताच त्यांनी भाजपा सोडण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपाच्या मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी गद्दारी केल्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी शहर अध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय यांनी दिली आहे. ते निवडून आले असते, तर मी काँग्रेसी आहे, असा विचार डॉ. सुनील देशमुखांनी केला असता का? त्यांचा काँग्रेसी विचार आम्ही संधीसाधू समजायचा का? असा प्रश्नही तुषार भारतीय यांनी उपस्थित केला.
'काँग्रेसमध्ये अनेकांच्या अस्तित्वाला धक्का' -
डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपा सोडल्याने भाजपाला कोणतेही नुकसान झाले नाही. उलट कॉंग्रेसमध्येच खळबळ उडाली असून शेखावत गट, खोडके गट यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे भाजपाचे तुषार भारतीय यांचे म्हणणे आहे.
'काँग्रेसला मिळाले बळ' -
डॉ. सुनील देशमुख शनिवारी कॉंग्रेसमध्ये पुन्हा परत येत असल्याने काँग्रेसला नवे बळ मिळाले असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांचे म्हणणे आहे. आता डॉ. सुनील देशमुख, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुलभा खोडके या नेत्यांमुळे महापालिकेतही काँग्रेसची सत्ता येणार, असा विश्वास बबलू शेखावत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; 'हे' आहेत खलनायक