अमरावती - कोरोनामुळे 23 मार्च 2020पासून शैक्षणिक सेवा बंद केली असताना विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क वसूल करण्याचा तगडा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने लावला आहे. गंभीर बाब म्हणजे शुल्क भरले नसल्याने विद्यार्थ्यांना आता परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार शाळेने केला असल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकऱ्यांकडे धाव घेऊन शाळेविरुद्ध तक्रार दिली आहे.
सेवा नाही तर शुल्क कसले?
पोदार इंटरनॅशनल स्कूल ही व्यापरी प्रतिष्ठान म्हणून कंपनी कायदाअंतर्गत नोंदणीकृत आहे. त्यामुळे देशातील प्रचलित कायद्याप्रमाणे आमच्या पाल्याला शैक्षणिक सेवा प्रदान करून त्या मोबदल्यात शुल्क आकारणे हा नियम असल्याचे पालकांचे म्हणणे होते.
शाळेने पोर्टल केले बंद
पालक समिती गठीत करणे आवश्यक असताना पोदार शाळा व्यवस्थापनाने यावर्षी पालक समिती गठीत केली नाही. यासोबतच शाळेचे ' बीटवीन अस' हे पोर्टल शुल्क न भरणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेपासून शेकडो विद्यर्थ्यांना वंचित ठेवले जाणार असून आमच्या पाल्यांच्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
50 टक्के शुल्क भरण्याची तयारी
लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय, उद्योग ठप्प असल्याने सर्व पालक पूर्ण शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. मात्र काहीशी तडजोड करून आम्ही 50 टक्के ट्युशन शुल्क भरण्यास तयार आहोत, असे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.