अमरावती - ग्रामीण भागात अनेकदा आपला आजार लपविला जातो. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण भागातील रुग्णांना कर्करोग, क्षयरोगची तपासणी करता यावी आणि योग्य उपचार मिळावेत. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व्हावे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाआरोग्य शिबिर आयोजित केले असून याचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय आणि दंत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन डॉ. अनिल बोंडे यांनी केले. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम आदी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय आणि दंत महाआरोग्य शिबिर यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील उपचाराचा लाभ वंचित घटकातील नागरिकांना होतो. यामुळे येथील सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हा रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व इतर सार्वजनिक रुग्णालयाचे सक्षमीकरण करण्यात येईल. वैद्यकीय उपचाराचा खर्च परवडत नसल्याने गरिबांसाठी आयुष्यमान भारत योजना ही वरदान ठरणार आहे. या योजनेद्वारे खासगी रुग्णालयातही गरिबांना सेवा मिळणार आहे.आयुष्यमान कार्डधारकांना राज्याबाहेरील रुग्णालयात देखील उपचार घेता येतील. पाच लाख रुपयांपर्यंत उपचार आणि सेवा याद्वारे मिळणार असल्याची माहिती बोंडेंनी यावेळी दिली. महाआरोग्य शिबिरात आज शनिवारी सकाळपासून विविध तापासण्यांसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. चार दिवस चालणाऱ्या या शिबिरात मेळघाटातील आदिवासी रुग्णांना खास वाहनांद्वारे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.