अमरावती - नव्या वर्षाच्या पहिल्याच सोमवारी ( 3 जानेवारी ) जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटांतील मुलांना कोरोनाचे कवच मिळणार असून, जिल्ह्यात एकूण 155 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ओमायक्रॉनचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्यामुळे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जाणार आहे.
कोव्हॅक्सिन लस दिली जाणार
जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटांतील एकूण 9 लाख 49 हजार 956 मुलांना 155 केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस दिली जाणार आहे. ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वीचा असेल अशी सर्व मुले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. ही सुविधा एक जानेवारीपासून सुरू होणार आहे. या शिवाय लसीकरण केंद्रावरही ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली जाणार आहे.
बालकांसाठी स्वतंत्र रांगा
अमरावती जिल्ह्यात 18 वर्षे वयोगटांतील व्यक्तींचे एकूण 80 टक्केच लसीकरण झाले असून, उर्वरित व्यक्तींनी त्वरित लसीकरण करावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान लसीकरण केंद्रांवर लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.
ज्येष्ठ व्यक्तींना मिळणार बूस्टर डोज
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोज देण्यात येणार आहे. दुसऱ्या डॉजच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींनाच हा डोज दिला जाणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रन्टलाईन वर्करलाही बूस्टर डोज दिला जाणार आहे.
अमरावतीत कोरोनाचा संसर्ग वाढला
अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरना रुग्ण वाढायला लागले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात एकूण 13 कोरोना रुग्ण आढळून आले होते तर, शुक्रवारी अकरा रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह कोरना रुग्णांची संख्या 34 असून, यापैकी अमरावती शहरात 29 रुग्ण तर, ग्रामीण भागात 5 रुग्ण आहेत.
हेही वाचा - Electrocution In Amravati : प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू