अमरावती : शिक्षण संस्थेला बनावट टीईटी प्रमाणपत्र ( Case of bogus TET certificate )देणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बनावट टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये शिक्षकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण ठरले आहे.( bogus TET certificate holder in amravati district )
अंजनगाव सुर्जी च्या संगई शाळेतील प्रकार : कुशल कृष्णराव अंबाडकर राहणार जरूड, ह.मु. टाकनगर, अंजनगाव सुर्जी गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई प्राथमिक शाळेत ( Sitabai Sangai Primary School ) शिक्षक म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांची शिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी नियुक्तीसाठी आवश्यक टीईटी प्रमाणपत्र संस्थेला सादर केले होते. तथा ते प्रमाणपत्र खरे असल्याबाबत दिले. संस्थेला बंधपत्र दिले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांनी केलेल्या चौकशीत त्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल : त्यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून संस्थेस सादर केले, शासनाची फसवणूक केली. त्यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. सीताबाई संगई संस्थेचे संयुक्त सचिव प्रसाद संगई यांनी कुशल अंबाडकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
जिल्ह्यात दहा बोगस टीईटी धारक : जानेवारी २०१९ च्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार करून बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून पात्र झालेल्या उमेदवारांची संपादणूक रद्द करून त्यांच्यावर शास्ती करण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ऑगस्ट महिन्यात काढला होता. त्यात अमरावती जिल्ह्यातील दहा शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले होते. अंबाडकर यांच्यासह त्या शिक्षकांवर सुद्धा फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील 10 शिक्षकांवर ठपका : टी ई टी गैरप्रकारात 2013 नंतर उत्तीर्ण व नियुक्त झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले होते. चौकशीनंतर राज्यातील 7874 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 10 शिक्षकांवर अपात्रतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काय आहे टीईटी घोटाळा प्रकरण : २०१९ साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले होते. TET परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ हजार ८८० उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
पगार करू नये ,शिक्षण संचालकाचे आदेश : शिक्षण संचालकाचे आदेशानुसार संपूर्ण राज्यातील शिक्षकांवर वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याचे वेतन करू नये अशा सूचना आहेत. या सूचनांचे उल्लंघन करून वेतन केल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.