अमरावती - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात देखील कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती उपाययोजना करावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. अमरावतीत देखील नागरिकांना कोरोना विषाणूपासून बचाव करता यावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा... पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ वर
मॉडेल रेल्वे स्थानकावर कोरोना बाबत जनजागृती...
कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता, मध्य रेल्वे मुबंई विभागाच्या सर्व रेल्वे स्थानकावर अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील मॉडेल रेल्वे स्थानकावर देखील कोरोनाबाबत माहिती दिली जात आहे. भिंतीवर लावलेल्या छोट्या फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जात आहे. ज्यात नागरिकांनी काय करावे आणि काय करू करू नये, याची माहिती दिली जात आहे.
शिक्षकांकडून चित्र रेखाटून कोरोनाविषयी जनजागृती...
कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. लोकांनी कोरोनाची अनावश्यक भीती बाळगू नये, यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे कला विषयाचे शिक्षक अजय जीरापूरे यांनी शाळेच्या फलकावर चित्ररेखाटन केले आहे. ज्यात लोकांना आणि मुलांना कोरोना विषाणूपासून सावध राहण्याचा संदेश दिला आहे.