मुंबई : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या उत्साहात उघडला. या दरम्यान सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा ओलांडला, तर निफ्टीनेही जोरदार कमाई केली. या दरम्यान बीएसई सेन्सेक्स 554.06 अंकांनी किंवा 0.91 टक्क्यांनी वाढून 60,363.03 अंकांवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी 143.35 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्यांनी वाढून 17,737.70 वर होता.
बहुतांश आशियाई बाजार नफ्यात : 30 शेअर्सच्या आधारे सेन्सेक्समधील 28 शेअर्स वाढीसह आणि उर्वरित दोन शेअर्स किरकोळ तोट्यासह व्यवहार करत होते. एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस आणि रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. हाँगकाँग आणि जपानसह बहुतांश आशियाई बाजार सोमवारी नफ्यात होते. महागाईत सुधारणा होण्याच्या आशेने शुक्रवारी युरोपीय आणि अमेरिकन बाजार मजबूत वाढीसह बंद झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्स तेजीत : जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक कल आणि परदेशी निधीच्या ताज्या खरेदीमुळे शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स जवळपास 900 अंकांवर चढला, तर एनएसई निफ्टी 272 अंकांपेक्षा अधिक वाढला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) शुक्रवारी निव्वळ आधारावर 246.24 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. दुसरीकडे, सुरुवातीच्या (इंटरबँक फॉरेन एक्स्चेंज) व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी वाढून 81.86 वर पोहोचला. शुक्रवारी अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया ८१.९७ वर बंद झाला होता.
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांबाबत नवे नियम : केंद्र सरकारने हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीबाबत नियमांमध्ये बदल लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार आता सध्या लागू असलेल्या चार हॉलमार्कऐवजी सहा हॉलमार्कच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री आणि खरेदी करावी लागणार आहे. 31 मार्च 2023 नंतर, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) असल्याशिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार नाही. हे सर्व नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत.
हेही वाचा : Gold Hallmark : सोन्याच्या दागिन्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता सहा अंकी हॉलमार्क लागू होणार