मुंबई : मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तीन ऑइल रिफायनिंग आणि मार्केटिंग कंपन्यांसाठी स्थिर रेटिंगची पुष्टी केली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घट : मूडीजच्या सहाय्यक उपाध्यक्ष आणि विश्लेषक स्वेता पटोडिया म्हणाल्या, 'कच्च्या तेलाच्या कमी किमतीमुळे मार्केटिंग तोटा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी मालकीच्या रिफायनिंग आणि मार्केटिंग कंपन्यांच्या प्रदर्शनात सुधारणा होत राहील, असे आमचे रेटिंग दर्शवत आहे'. पटोडिया असेही म्हणाल्या की, 'या कंपन्यांच्या रेटिंग आउटलुकमधून मूडीजला अपेक्षा आहे की, सरकार तेल विपणन कंपन्यांना पाठिंबा देईल आणि त्यांच्या मागील नुकसानीची भरपाई करेल. तसेच सरकारी मालकीच्या रिफायनिंग आणि मार्केटिंग कंपन्यांचे क्रेडिट मेट्रिक्स सामान्य होतील आणि मार्च 2024 पर्यंत ते आमच्या रेटिंग थ्रेशोल्डमध्ये असतील.'
तेल कंपन्यांच्या नफ्यात वाढ : रेटिंगच्या दृष्टीकोनामागील तर्क स्पष्ट करताना मूडीजने म्हटले आहे की, ऑक्टोबर 2022 पासून ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरून सरासरी 85 डॉलर प्रति बॅरल इतक्या झाल्या आहेत. तसेच तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) नफ्यात देखील या काळात वाढ झाली आहे, कारण पेट्रोलियम उत्पादनांच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत या कालावधीत काहीही बदल झालेला नाही.
रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम : त्या पुढे म्हणाल्या की, 'रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी वाढलेली आहे, जी ब्रेंट क्रूडच्या तुलनेत सवलतीने व्यापार करत आहे. याचाही फायदा भारतीय रिफायनर्सना झाला आहे. रशिया - युक्रेन संघर्षापूर्वी भारतीय रिफायनर्सच्या एकूण कच्च्या तेलाच्या वापरापैकी रशियन क्रूडचा वाटा 2 टक्क्यांपेक्षा कमी होता. परंतु त्यानंतर तो सुमारे 15 - 20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पुढील 12-18 महिन्यांपर्यंत हा ट्रेंड सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा भारतीय रिफायनर्सना होईल. मूडीजने पुढे नमूद केले की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीनही कंपन्या त्यांच्या अल्प मुदतीच्या कर्जाच्या तुलनेत कमी रोख शिल्लक ठेवतात. त्यामुळे कंपन्यांची सध्याची रोख शिल्लक पुढील 12 महिन्यांत त्यांचा भांडवली खर्च, लाभांश देयके आणि कर्ज परिपक्व होण्यासाठी अपुरी पडू शकते.