मुंबई - इराण आणि अमेरिकेतील वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. जोखीम वाढणार असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १६२ अंशांची घसरण झाली आहे.
जागतिक खनिज तेलाच्या बाजारपेठेत प्रति बॅरलचा दर ४.४ टक्क्यांनी वाढून ६९.१६ डॉलर झाला आहे. इराण हा जगाला खनिज तेलाचा पुरवठा करणारा आघाडीचा देश आहे. इराण अमेरिकेत अत्यंत तणावाची स्थिती असल्याने जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती आहे.
हेही वाचा-किया मोटर्सच्या वाहनांच्या किमतीत ३५ हजार रुपयापर्यंत वाढ
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १६२.०३ अंशाने घसरून ४१,४६४.६१ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक ५५.५५ अंशाने घसरून १२,२२६.६५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
सर्वाधिक एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहे. अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, एसबीआय, एनटीपीसी आणि बजाज फायनान्सचे शेअरही घसरले आहेत. सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलचे शेअर २.०८ टक्क्यांनी वधारले. रुपयाची डॉलरच्या तुलनेत दिवसभरात ३७ पैशांनी घसरण झाली आहे.
हेही वाचा-'या' कंपनीला सुमारे १५ हजार कोटी भरण्याची दूरसंचार विभागाने दिली नोटीस
अमेरिकेच्या विमानाने केलेल्या हल्ल्यात इराणच्या सैन्याचे कमांडर कासिम सोलेइमानी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रादेशिक तणाव निर्माण होईल, अशी भीती जगभरातील नेते व्यक्त करीत आहेत.