मुंबई - गुरूवारची सकाळ भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरली. शेअर बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक विक्रमी पातळी ओलांडली. सकाळच्या सत्राच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स 304 अंकांनी वधारून 50 हजार अंकांचा वर पोहोचला. सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच ही विक्रमी पातळी ओलांडली आहे.
बीएसईचा ऐतिहासिक विक्रम
गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स 50 हजारांच्या उंबरठ्यावर होता. त्यामुळं ही पातळी सेन्सेक्स कधी ओलांडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. गुरूवारी सकाळी सेन्सेक्सने ही पातळी गाठली. सकाळच्या सत्रात बीएसईच्या 30 शेअरमध्ये मोठी वाढ झाली. बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 50,126 अंकांवर पोहोचला.
निफ्टीनेही ओलांडला 14,700 चा टप्पा
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळी तेजीचे वातावरण होते. निफ्टीही 50 अंकांनी वधारून प्रथमच 14,730 अंकांवर पोहोचला.
हेही वाचा - जागतिक बाजारात सकारात्मक चित्र; शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गाठला नवा उच्चांक
रिलायन्स, बजाजचे शेअर्स वधारले
रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या निर्देशांकात मोठी वाढ बघायला मिळाली.बजाज फिनसर्वने 4 टक्क्यांची वाढ नोंदवली. याशिवाय इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, टीसीएस आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
परदेशी गुंतवणुकदारांमध्ये उत्साह
परदेशी गुंतवणुकदारांच्या उत्साहामुळे सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी एफपीआयकडून सुमारे 2289 कोटींच्या शेअर्सची खरेदी झाल्याचे एक्स्चेंड डेटामधून समोर आले आहे.
बायडेन यांच्या शपथविधीनंतर तेजी
जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अमेरिकन इक्विटीनेही बुधवारी विक्रमी पातळी गाठली. जागतिक बाजारातही चांगलीच तेजी बघायला मिळाली आहे.
हेही वाचा - जॅक मा अखेर व्हिडिओमधून आले समोर; दोन महिने होते बेपत्ता