मुंबई - चांगले आशय आणि विषय असलेले मराठी चित्रपट केवळ आपल्याकडच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत, तर साता समुद्रापारही फिल्म फेस्टीव्हलमध्ये बाजी मारत आहेत. त्याबरोबरच तिकीट बारीवरही समाधानकारक कमाई होत असल्यामुळे मराठी सिनेमाकडं हिंदीसह इतर भाषिक कलाकारही आकर्षित झाल्याचं पाहायला मिळतं. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलं असून बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री एली अवराम ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे.
फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शननं निर्मिती केलेला आणि अजिंक्य बापू फाळकेंचं दिग्दर्शन असलेला ‘इलू इलू’ हा मनोरंजक चित्रपट येत्या ३१ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आला. या चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर परफॉर्मन्स करुन एलीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
२०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या एलीनं आतापर्यंत 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य भाषेतील तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली अवराम ‘मिस पिंटो’ ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे. सराव नसलेल्या मराठी भाषेत अभिनय करताना तिनं एक मोठं आव्हान पेलंलं आहे.
मराठीत फिल्म्समध्ये एन्ट्री करण्याबाबत बोलताना एली अवराम म्हणाली की, "मला नेहमीच नव्या गोष्टी करायला, शिकायला आवडतं. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटात काम केल्यानंतर आता मला मराठी भाषेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. आजवर कधीही न साकारलेलं पात्र यात मी करत आहे. एका नव्या स्वरुपात मी लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा अर्थातच एक दडपण जाणवलं, परंतु या चित्रपटाची पटकथा आणि जी व्यक्तीरेखा माझ्यासाठी ऑफर झाली होती ही संधी मला गमवायची नव्हती, म्हणून मी होकार कळवला."
‘इलू इलू’ या प्रेमकथा असलेल्या चित्रपटात एली अवरामसह वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांची आहे. बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके या चित्रपटाचे निर्माता आहेत तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. योगेश कोळी यांचं छायाकंन, नितेश राठोड यांचं संकलन असलेल्या या चित्रपटातील वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचं संगीतकार रोहित नागभिडे, विजय गवंडे असून योगेश इंगळे यांनी याचं कलादिग्दर्शन केलंय. ‘इलू इलू’ हा चित्रपट ३१ जानेवारी 2025 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.