ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वामन शंकर मराठे ज्वेलर्सच्या दुकानाचं शटर उचकटून दोन अज्ञात चोरट्यांनी ५ कोटी ७९ लाखाचं सोनं लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे घडल्याची माहिती, ठाणे पोलीस जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली. तर दुकानातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही चोरी १६ तारखेला रात्री करण्यात आली होती.
५ कोटी ७९ लाखाचं सोनं लुटलं : नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दोन आरोपी आढळत असल्याची माहिती साळवी यांनी दिली. या जबरी चोरीत चोरट्यांनी मेन गेट आणि दुकानाचं शटर उचकटून ५ कोटी ७९ लाखाचं सोनं घेऊन पोबारा केला आहे.
सराफी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण : वामन शंकर मराठे ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आणि वर्दळीच्या ठिकाणीच चोरी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेचा संयुक्त तपास : नौपाडा येथील धाडसी चोरीच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागल्यानंतर मात्र, आता नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्त तपास सुरू केला आहे. तर अनेक टीम बनवून दोन चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सीसीटीव्ही, मोबाईलचा तांत्रिक अभ्यास आणि विश्लेषण करून आरोपींचा मागोवा घेत पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती, शैलेश साळवी यांनी दिली.
रेकी करून चोरीची शक्यता? : वामन शंकर मराठे ज्वेलर्स चोरी प्रकरणी चोरट्यांनी दुकानाची रेकी करून जबरी चोरीचा प्लॅन केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडं स्थानिक पोलिसांची गस्त प्रत्येक सराफी पेढीवर आहे. गर्दीचा अंदाज घेऊन वर्दळीच्या ठिकाणी धाडसी जबरी चोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, लवकरच आरोपी हे गजाआड होतील असा विश्वासही शैलेश साळवी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -