नवी दिल्ली – पेट्रोलच्या किमती सलग सहाव्या दिवशी वाढल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या बॅरलचा दर 45 डॉलर राहिला आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर 11 पैशांनी वाढविल्या आहेत. तर मुंबई आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 9 पैशांनी वाढविले आहेत.
असे आहेत महानगरामधील पेट्रोल-डिझेलचे दर -
इंडियन ऑईल वेबसाईटच्या माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.73 रुपये, कोलकात्यात प्रति लिटर 83.24 रुपये, मुंबईमध्ये प्रति लिटर 88.39 रुपये आणि चेन्नईत 84.73 रुपये आहे. तर या महानगरांमध्ये डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 73.56 रुपये, कोलकात्यात 77.06 रुपये, मुंबईत 80.11 रुपये तर चेन्नईत 78.86 रुपये दर आहे. डिझेलच्या किमती 30 जुलैपासून स्थिर राहिल्या आहेत.
गेल्या 10 दिवसात नऊवेळा दिल्लीत पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. या 10 दिवसांत पेट्रोलचा दर प्रति लिटर 1.30 रुपयाने वाढला आहे. बेंचमार्क खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर नोव्हेंबरच्या सौद्यासाठी वाढवून 45.75 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर अमेरिकेतील खनिज तेलाचा निर्देशांकातही प्रति बॅरलचे दर 42 डॉलरहून अधिक झाले आहेत.