जळगाव - कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या काळात विक्रमी पातळीवर गेलेले सोन्याचे दर आता घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात 5 टक्क्यांनी कपात केल्याने सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. जळगाव सराफा बाजारात गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोन्याची तेजी काहीशी कमी झाली आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू झालेली नफेखोरी त्याचप्रमाणे, डॉलरच्या तुलनेत काहीसा सावरलेला भारतीय रुपया तसेच कोरोना लसीकरण या कारणांमुळे सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक अर्थव्यवस्था आता काहीअंशी सावरत असल्याने सोन्याचे दर खाली येत आहेत. सोने खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही योग्य वेळ असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याचे दर अजून खाली येतील, अशी शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा-एलआयसीचा आयपीओ दिवाळीत खुला होणार
ऐन लग्नसराईत घसरले सोने-
गेल्या काही महिन्यांत सोने व चांदीचे दर खूप वाढले. सोन्याच्या दराने 50 हजार तर चांदीच्या दराने 75 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता मात्र, आयात शुल्क कमी केल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने किरकोळ ग्राहकांना दिलासा मिळाला असून, त्यांना सोने खरेदीचा आनंद घेता येणार आहे. सोन्याच्या दरातील घसरण ही किरकोळ ग्राहकांसाठी खरेदीची संधी घेऊन आली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दर कमी झाल्याने सोन्याची मागणी वाढेल. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे, अशी माहिती जळगावातील भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, सोन्याचे दर कमी झाल्याने जळगावात सोने खरेदीसाठी ग्राहकांची सराफी पेढ्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
हेही वाचा-डिजीटल चलनावर आरबीआय लवकरच करणार शिक्कामोर्तब
तोपर्यंत सोन्यात तेजी नाही-
ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56 हजार 500 रुपयांच्या टप्प्यावर गेले होते. मात्र, आता या विक्रमी पातळीपासून 8 ते 9 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याला 1770 डॉलरच्या जवळ चांगला सपोर्ट आहे. भारतात सोने 46 ते 47 हजार रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याने सुवर्ण बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे. बॉण्ड यिल्डमध्ये जोपर्यंत घसरण होत नाही, तोवर सोन्याच्या तेजीसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
असे आहेत जळगावातील आजचे दर-
सोने- 48 हजार 600 (3 टक्के जीएसटीसह) प्रति तोळा
चांदी- 70 हजार 500 (3 टक्के जीएसटीसह) प्रति किलो
ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने सराफा बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक समाधान व्यक्त करत आहेत.