नवी दिल्ली – कोरोना महामारीत अनिश्चितता असतानाही सोन्यासह चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1 हजार 492 रुपयांनी घसरून 52 हजार 819 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुची विक्री वाढली आहे. त्यामुळे राजधानीत सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
सोन्याचा दर मागील सत्रात प्रति तोळा 54 हजार 311 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलोला 1 हजार 476 रुपयांनी घसरून 67 हजार 924 रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 69 हजार 400 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1 हजार 927 डॉलर झाला आहे. तर चांदीचा दर घसरून प्रति औंस 26.71 डॉलर झाला आहे.
अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केटच्या बैठकीनंतर अमेरिकेत डॉलरचे मूल्य गुरुवारी वधारले आहे. कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर होणाऱ्या परिणामाबाबत अमेरिकेच्या ओपन मार्केट कमिटीने चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर सोन्याचे दर आणखी घसरल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.