नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच आज तेल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. राजधानीत पेट्रोल हे ९ पैशांनी वाढून प्रति लिटर ७१.१२ रुपयावर पोहोचले. तर डिझेल १५ पैशांनी वाढून प्रति लिटर ६६.११ रुपये झाले आहे. निवडणुकीपुरते नियंत्रणात ठेवलेले पेट्रोल-डिझेलचे दर आता वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागतिक बाजारपेठेत मे महिन्यात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. तरीही राजधानीत गेली १५ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर घसरत होते. सूत्राच्या माहितीनुसार केंद्र सरकारने तेल कंपन्यांना निवडणुकीदरम्यान दर नियंत्रणात ठेवण्याची सूचना केली होती.
ग्राहकांना इंधन दरवाढीचा फटका बसणार -
निवडणूक संपताच सरकारी तेल कंपन्यांना झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. या तेल कंपन्या बाजारातील दराप्रमाणे तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढविणार आहे. त्यामुळे नवे सरकार सत्तेत येईपर्यंत ग्राहकांना इंधन दरवाढीचा फटका बसणार आहे.
यामुळे दर वाढू शकतात-
गल्फ देशांत तणावाची स्थिती, इराणकडून बंद झालेला तेलपुरवठा आणि व्हेनेझुएलाचे कच्च्या तेलाचे दर वाढविण्याला समर्थन यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारने उत्पादन शुल्क आणि व्हॅट कमी केला तरच हे कच्च्या तेलाचे दर कमी होवू शकतात.
एक रुपयाने पेट्रोल स्वस्त झाल्यास होते १५० कोटींचे नुकसान-
सरकारमधील सूत्राच्या माहितीनुसार तेल कंपन्या पेट्रोल प्रति लिटर ५ रुपयाच्या सवलतीने मार्च व मेमध्ये विकले. तर डिझेल प्रति लिटिर ३ रुपये सवलतीने विकले. मार्च व मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल वाढले होते. हीच परिस्थिती मे महिन्यातही राहिल्याचे दिसून आले आहे. बाजारातील अंदाजानुसार एक दिवसही पेट्रोल व डिझेल १ रुपयाने स्वस्त केले तर तेल कंपन्यांचे १५० कोटींहून अधिक नुकसान होते. या अंदाजानुसार तेल कंपन्यांचे लोकसभा निवडणुकीदरम्यान हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढूनही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. यापूर्वीही केंद्र सरकारनेही निवडणुकीत पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान १९ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्यात आले नव्हते. याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले होते.