चेन्नई – कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी लागू केल्याने देशातील लाखो लोकांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. तामिळनाडूमध्ये विशेषत: चेन्नईमधील 8 हजारांहून अधिक कार व टॅक्सी चालक यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
कोरोना महामारीत टाळेबंदीचे नियम शिथील करण्यात आले असले तरी अनेक उद्योग पूर्वीप्रमाणे सुरू झाले नाहीत. तामिळनाडूमध्ये व्यवसाय सुरू केलेल्या व्यक्तींना कर्जाचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे. बाजारात अनेक वस्तुंची विक्री करणे होत नसल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
टाईपिस्ट, व्यवस्थापक, साफसफाई कामगार आणि ऑफिस सहाय्यक अशी कामे करणारे विविध लोकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. चेन्नईसह तामिळनाडूमधील हॉटेलमध्ये काम करणारे आचारी, कामगार आणि इतर लोक हे रोजगार गमाविल्याने घरी बसून आहेत.
बेरोजगारी वाढल्याने काही ठिकाणी महाविद्यालयातील प्राध्यापक रस्त्यावर मिठाई विकत आहेत. तर नाटकातील कलाकार हे डोसा विकत आहेत. तर वाहन चालक फुगे विकण्याचे काम करताना दिसत आहेत. परिस्थिती पुन्हा पुर्ववत कधी होईल, याचे सरकारकडेही उत्तर नाही. असे असले तरी अर्थतज्ज्ञांच्या मते सामान्य स्थिती होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
मानसिक आजारी असलेल्या लोकांवर महामारीचा आणखी वाईट परिणाम होणार असल्याचे मानसिक समुपदेशक सांगतात. कोरोना संसर्ग, बेरोजगारी आणि अन्नाची कमतरता अशी भीती त्यांना वाटू शकते, असे मानसिक समुपदेशकांनी सांगितले. बेरोजगारी आणि आर्थिक दुर्बलता या दोन कारणांनी हिंसा, चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.