नवी दिल्ली - देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत घसरून ४.९ टक्के राहील, असा अंदाज एनसीएईआर या आर्थिक टँक संस्थेने केला. हा परिणाम सर्वच क्षेत्रात मंदावलेली स्थिती दिसत असल्याने होणार असल्याचे एनसीएईआरने म्हटले आहे.
नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीईआर) दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपी ४.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत जीडीपी हा ६.८ टक्के होता. पतधोरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आणखी आर्थिक चालना देणारे निर्णय घ्यावेत, असे एनसीईआरने सूचविले आहे. ते आव्हानात्मक असले तरी अधिक महसूल निर्मितीमधून शक्य असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा-धक्कादायक! केवळ 'या' शहराचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित; सर्व महानगरे निकषात नापास
मागणीची समस्या असल्याने सध्याचा वृद्धीदर हा मंदावलेला आहे. आर्थिक सुधारणांनी वृद्धीदराच्या प्रश्नावर मात करणे शक्य असल्याचे एनसीएईआरचे संशोधक सुदिप्तो मुंडले यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. वित्तीय तूट न वाढविता खर्च करण्याची गरज आहे. आपले नेते धाडसी आहेत. अप्रत्यक्ष सीमा शुल्क कमी करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट कर कमी करण्याची गरज नव्हती. कंपन्या पुन्हा गुंतवणूक करत आहेत का ? यामुळे परिस्थिती आणखी वाईट झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार