मुंबई –देशामधून उत्पादनांची होणारी निर्यात जुलैमध्ये वाढली आहे. कारण देशामधून चीनसह आशियाई देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीत 78 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण निर्यातीच्या 16 टक्के आहे.
देशामधून होणाऱ्या निर्यातीत जुलैमध्ये 10.2 टक्क्यांची घसरण झाली होती. तर एप्रिलमध्ये देशामधून उत्पादनांच्या निर्यातीत 60.2 टक्क्यांची घसरण झाली होती.
कोरोना महामारीत टाळेबंदीनंतर पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होताना निर्यातीच्या घसरणीचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. मे महिन्यातील निर्यातीची घसरण कमी होवून 50 टक्के निर्यात तर जूनमध्ये 30 टक्के घसरण कमी झाली आहे.
कोरोनाचे नियंत्रण असलेल्या देशांमध्ये वाढली निर्यात
क्रिसीलच्या अहवालानुसार जुलैमध्ये चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण हे 78 टक्के झाले आहे. तर मलेशियात निर्यातीचे प्रमाण हे 76 टक्के झाले आहे. व्हिएतनाममध्ये 43 टक्के व सिंगापूरमध्ये 37 टक्के निर्यात झाली आहे. यामधील बहुतांश अर्थव्यवस्थांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे पश्चिमकेडील देश असलेल्या अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटनमध्ये होणाऱ्या निर्यातीत घसरण झाली आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
भारतामधून निर्यात होण्याचे असे आहे प्रमाण
लोहखनिज-63 टक्के, तांदूळ- 33 टक्के, मसाले -23 टक्के- सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने-19 टक्के, मत्स्योत्पादने-11 टक्के, औषधे-10 टक्के
चीनने कोरोनाच्या संसर्गावर इतर देशांच्या तुलनेत लवकर नियंत्रण मिळविले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेने जूनच्या तिमाहीत 3.2 टक्के विकासदर नोंदविला आहे. तर बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात मोठी घसरण झाली आहे.