मुंबई - देशाची अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अपेक्षेहून सुधारत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. ते फॉरेन एक्सचेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफईडीएआय) चौथ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या अपेक्षेचे पूनर्मुल्यांकन करावे लागणार असल्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा २३.९ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत अनेक पद्धतीने चलनवलन पूर्ववत होत आहे. एवढेच नव्हेतर आर्थिक विकासदरात वाढ होत आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने विकासदरातील जोखीम वाढत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुढे शक्तिकांत दास म्हणाले, की सणानंतर मागणी शाश्वत राहण्यासाठी आपण दक्ष राहण्याची गरज आहे.
एफपीआय आणि एफडीआयचे प्रमाण पूर्ववत-
- सलग दोन तिमाहीदरम्यान देशाच्या चालू खात्यात अतिरिक्त निधी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या महिन्यात देशाची बाह्य स्थिती स्थिर व संतुलित राहणार आहे.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक (एफपीआय) आणि थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) यांचे प्रमाण पूर्ववत होत आहे.
- विदेशी गंगाजळीचे प्रमाण स्थिर राहिले आहे.
सरकारी धोरणात बदल-
सरकारने जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढविण्याच्या धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये काही क्षेत्रांना उत्पादनावर प्रोत्साहन अशा धोरणांचा समावेश असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले. ऑक्टोबरमध्ये पतधोरण समितीने तात्पुरत्या काळात वाढणाऱ्या महागाईकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती. तसेच चालू आर्थिक वर्षात लवचिक धोरण स्वीकारले होते.
ऑक्टोबरमध्ये पतधोरण समितीने हे घेतले निर्णय-
आरबीआयच्या पतधोरण समितीने ४ टक्के रेपो दर हा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर ९.५ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला होता. डिसेंबर आणि मार्चच्या तिमाहीत महागाई ही आरबीआयच्या मर्यादापर्यंत पोहोचेल, असे दास यांनी म्हटले होते.