नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येत्या १० ते १५ वर्षात अर्थव्यवस्था १० लाख कोटी डॉलरची होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'डिफे कनेक्ट २०१९' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या स्टार्टअप योजनेबद्दल अभिमान व्यक्त केला.
राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशामधील बुद्धिमत्ता पाहता, मला खूप आत्मविश्वास वाटतो. येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची आपली अर्थव्यवस्था होवू शकते, असे त्यांनी म्हटले.
संरक्षण उत्पादनाचा मोठा आयातदार देश असण्याऐवजी भारत हा संरक्षण उत्पादनांचे नवसंशोधन आणि मोठी निर्यात करणार आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन (इनक्यूबेशन) देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
हेही वाचा-मंदीचे ग्रहण सुटेना! औद्योगिक उत्पादनाच्या दरात ४.३ टक्के घसरण
पुढे केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणाले, एखादी कल्पना ही मोठी असू शकते किंवा समस्येवरील उपाय हा नवसंशोधक मनाला सापडू शकतो. तरीही, प्रक्रिया ही काळजीपूर्वक केली नाही, अथवा अत्यंत उत्साही (पॅशोनेट) असे प्रोत्साहन मिळाले नाही तर प्रकल्प अपयशी ठरू शकतो.
हेही वाचा-भीम अॅप आता चालणार विदेशातही; सिंगापूर व भारतामध्ये सांमजस्य करार
संशोधन, विकास आणि उत्पादन ही संयुक्त प्रक्रिया आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राने एकजूट दाखविणे गरजेचे आहे. संरक्षण उद्योगाचे स्वदेशीकरण आणि राष्ट्रनिमिर्तीसाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण सचिव अजय कुमार म्हणाले, इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सेलन्सने (आयडीईएक्स) नवसंशोधकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी संधी दिली आहे.
सचिव (संरक्षण उत्पादन) सुभाष चंद्रा म्हणाले, २५० स्टार्टअपला निधी देणे, हे ध्येय आहे. त्यामधून येत्या ५ वर्षात ठोस स्वरुपाची ५० नवसंशोधन मिळविण्याचे ध्येय आहे.