नवी दिल्ली - फिच या पतमानांकन संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४.६ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला. हा अंदाज पूर्वीच्या अंदाजाहून कमी आहे.
व्यवसाय आणि ग्राहकामधील विश्वास कमी झाल्याने अर्थव्यवस्थेचा अंदाज घसरणार असल्याचे फिचने म्हटले आहे. फिचने देशाचे पतमानांकन हे 'बीबीबी' या श्रेणीत स्थिर ठेवले आहे. अर्थव्यवस्था सावरून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विकासदर हा ५.६ टक्के राहिल, असे फिचने म्हटले आहे. तर पुढील वर्षी ६.५ टक्के होईल, असा अंदाज केला आहे. पतधोरणातील सुलभता आणि वित्तीय धोरण आणि रचनात्मक सुधारणा या अपेक्षेने विकासदर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा
भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर इतर देशांच्या तुलनेत सुदृढ आहे. मात्र, गेल्या तिमाही विकासदर कमी राहिला आहे. बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील अपुऱ्या कर्जपुरवठा आणि ग्राहकासह व्यवसायामधील विश्वास कमी झाल्याने विकासदर कमी राहिला आहे.
हेही वाचा-गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर
देशाकडे विदेशी चलनाचा चांगला साठा आहे. काही क्षेत्राचा घटलेला वृद्धीदर, कमकुवत वित्तीय क्षेत्र आणि सार्वजनिक कर्जाचे वाढलेले प्रमाण याकडेही फिचने लक्ष वेधले आहे.