नवी दिल्ली - फिक्कीनेही इतर उद्योगांप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पातून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांना लागणाऱ्या कच्चा मालावरील आयात शुल्कात कपात करावी, अशी अपेक्षा उद्योगांची संघटना फिक्कीने केली आहे.
देशात निर्मिती न होणाऱ्या व आयात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांवरील आयात शुल्कात कपात करावी, अशी मागणी फिक्कीने केली आहे. देशात काही दर्जेदार वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. अशा वैद्यकीय उपकरणांची आयात करताना त्यावर जादा आयात शुल्क लागू होऊ नये. त्यामुळे आरोग्य क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेवरील जादा बोझा टळू शकणार असल्याचे फिक्कीने म्हटले आहे.
हेही वाचा-मागणी वाढविण्याकरता अर्थसंकल्पातून मदत व्हावी; पीएचडी चेंबर
आयात शुल्कात एकसमानता असण्याची गरज-
वैद्यकीय उपकरणांवरील आयात शुल्क एकसारखे असण्याची गरज आहे. त्यासाठी ते उपकरण देशात नसणे, उत्पादन होण्यासाठी तीन किंवा त्याहून अधिक वर्षांनी उत्पादन करण्यासाठी वेळ लागणे, उपकरणांच्या निर्मितीसाठी अधिक गुंतवणूक किंवा अधिक उत्पादनांची गरज असे निकष असावेत, अशी फिक्कीने अपेक्षा व्यक्त केली आहे. आरोग्याच्या उपकरणांमुळे आरोग्याच्या पायाभूत क्षेत्रांवरील खर्चात अधिक वाढ होते. त्याचा आर्थिक भार हा रुग्णांंना सोसावा लागतो.
हेही वाचा- अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार महत्त्वाची 20 आर्थिक विधेयके
निर्यात हे अर्थव्यवस्थेसाठी इंजिन-
निर्यात हे अर्थव्यवस्थेसाठी इंजिन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक तयारी करण्याची गरज आहे. गेल्या काही काळाचा विचार करता भारताच्या निर्यात क्षेत्राच्या कामगिरीत सातत्याने घसरण झाली आहे. त्याचा व्यापारी संतुलनावर परिणाम झाला आहे. निर्यातीमध्ये थेट प्राप्तिकरात वजावट मिळाली तर गुंतवणूक आकर्षित होऊ शकते. त्यामुळे देशातील निर्यात क्षेत्राला चालना मिळू शकते, असे फिक्कीने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.