नवी दिल्ली - देशाच्या निर्यातीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. निर्यात ऑक्टोबरमध्ये १.११ टक्क्यांनी घसरून २६.३८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. पेट्रोलियम, कार्पेट, चामडे उत्पादने, तांदूळ आणि चहा यांची निर्यात घटल्याने एकूण निर्यातीत घसरण झाली आहे.
निर्यातीबरोबर देशाच्या आयातीतही ऑक्टोबरमध्ये घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये आयात १६.३१ टक्क्यांनी घसरून ३७.३९ अब्ज डॉलर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये देशाची व्यापारी तूट ही ११ अब्ज डॉलर झाल्याचे सरकारी आकेडवारीतून दिसून आले. गतवर्षी देशाची व्यापारी तूट ही १८ अब्ज डॉलर एवढी होती.
हेही वाचा-बिल गेट्स पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; अॅमेझॉनच्या संस्थापकाला टाकले मागे
- सोन्याची आयात ५ टक्क्यांनी वाढून १.८४ अब्ज डॉलर झाली आहे.
- निर्यात करण्यात येणाऱ्या ३० महत्त्वाच्या क्षेत्रापैकी १८ क्षेत्रांची निर्यात ऑक्टोबरमध्ये घटली आहे.
ऑक्टोबरमधील उत्पादनांच्या निर्यात घटण्याचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)
- पेट्रोलियम उत्पादने-१४.६
- कार्पेट - १७
- चामडे उत्पादने - ७.६
- तांदूळ - २९.५
- चहाची निर्यात -६.१६
हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ; ग्राहकांच्या खिशाला कात्री
लुधियानाचे निर्यातदार एस. सी. रल्हान यांनी तातडीने विदेश व्यापार धोरण जाहीर करण्याची मागणी केली. जर या निर्णयाला उशीर झाला तर होणारे नुकसान सरकारच्या नियंत्रणाबाहेर असेल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
व्यापार तणाव आणि देशांतर्गत उत्पानासाठी संरक्षणवाद वाढल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले. याच कारणाने निर्यातीत अंशत: घट झाल्याचे त्यांनी म्हटले.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर हा गेल्या सहा वर्षातील नीचांकी म्हणजे ५ टक्के राहिला आहे. उत्पादन क्षेत्राची निराशाजनक कामगिरी केल्याने औद्योगिक उत्पादन हे सप्टेंबरमध्ये घसरले आहे.