नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पुढील 3 वर्षांसाठी सेवेची मुदतवाढ मिळाली आहे. भाजपाच्या सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये या पदाला मुदतवाढ मिळालेले ते पहिले गव्हर्नर आहेत.
"मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची 10-12-2021 पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, त्यांना नियुक्त करण्यास मान्यता दिल्याचे अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
शक्तिकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. 2018 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांची RBI गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली होती.
आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती होण्यापूर्वी शक्तीकांत दास हे वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते तसेच. वित्त, कर, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील महत्त्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. याशिवाय, शक्तीकांत दास यांनी जागतिक बँक, आशियाई विकास बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे.