बंगळुरू - बीएमडब्ल्यू व मर्सिडीजसारखी आलिशान चारचाकी घेऊन स्वत: चालविणे हे अनेकांचे स्वप्न असते. या चारचाकी ग्राहकांना भाड्याने घेऊन चालविता याव्यात, यासाठी ओला लवकरच सेवा सुरू करणार आहे. त्यासाठीचा परवाना ओला कंपनीला कर्नाटक राज्य वाहतूक विभागाने दिला आहे.
ग्राहकांना कार भाड्याने घेऊन चालविण्याची सेवा दोन शहरात व शहरांतर्गत घेता येणार आहे. त्यासाठी कमी कालावधीचे भाडे, दीर्घ कालावधीचे भाडे आणि कॉर्पोरेटसाठी भाडे अशा पद्धतीने कंपनी योजना सुरू करणार आहे. वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त एल. नरेंद्र होळकर यांनी ओलाला कॅब भाड्याने देण्याचा परवाना दिल्याची पुष्टी दिली.
ओलाच्या प्रवक्त्याने १२ प्रकारच्या कॅब भाड्याने देण्याची सेवा असल्याचे सांगितले. त्यामध्ये दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. स्व-चालक (सेल्फ ड्रायव्ह) प्रकारामध्ये ओला १० हजार चारचाकी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये सेडानसह स्पोर्ट्स युटिलिटी कारचा समावेश असणार आहे. ओला येत्या दोन वर्षात सेल्फ ड्रायव्ह व्यवसायात ५०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी कंपनी बीएमडब्ल्यू, ओडी आणि मर्सिडीज अशा आलिशान कार कंपन्यांबरोबर करार करणार आहे.
हेही वाचा-तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम
दरम्यान, नवी पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगांवर परिणाम होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते.