मेलबोर्न - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मानाच्या शिरपेचात नवा तूरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे. बँकेने नुकतेच मेलबोर्नमध्ये कार्यालय सुरू केले आहे.
व्हिक्टोरिया आणि भारतामधील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढविण्यासाठी एसबीआयची मेलबोर्नमधील शाखा सहाय्य करणार आहे. व्हिक्टोरिया आणि भारताने सामाईक भविष्यासाठी दहा वर्षांची रणनीती (स्ट्रॅटजी) जाहीर केली आहे.
व्हिक्टोरियाच्या लोकप्रतिनधीगृहाचे सचिव आणि खजिनदार स्टिव्ह डिमोपोवूलोस म्हणाले, व्हिक्टोरियामध्ये एसबीआयचे स्वागत करताना आनंद होत आहे. ही या राज्यात सुरू होणारी पहिली भारतीय बँक आहे. भारतामधील सर्वात मोठ्या व्यवसायिक बँकेची येथील गुंतवणूक म्हणजे आम्ही वित्तीय सेवांच्या क्षेत्रात समृद्ध असल्याचे निर्देशक आहे. तसेच आमचे मनुष्यबळ अतिकुशल असल्याचा पुरावा आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा ४ ऑक्टोबरला रेपो दरात कपात करण्याची शक्यता
मेलबोर्न शहर हे अत्यंत व्यावसायिक आणि उद्योगस्नेही आहे. अशा शहरात बँकेचे कार्यालय असणे म्हणजे खूप चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खेरा यांनी दिली. मेलबोर्नमधील बँकेने उठविलेला ठसा हा दोन देशामधील संबंध अधिक वृद्धिगंत करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडून ३० हजार कोटी रुपये घेण्याची शक्यता; 'ही' आहेत कारणे
या आहेत व्हिक्टोरियामध्ये भारतीय कंपन्या-
व्हिक्टोरियामध्ये भारतीय आयटीसह औषधी कंपन्यांची कार्यालये आहेत. यामध्ये सिप्ला, सायंट, एचसीएल, इन्फोसिस, रॅम्को, टीएसीएस, टेक महिंद्रा, उगम सोल्यूशन्स, विप्रो, झुंगा आणि ऑनलाईन अन्न सेवा देणारी झोमॅटो कंपनीच्या समावेश आहे.
हेही वाचा-सणाच्या मुहुर्तावर एसबीआयकडून दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात
व्हिक्टोरिया आणि भारतामधील व्यापार १.७६ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर
सरकारी आकडेवारीनुसार, व्हिक्टिोरिया आणि भारतामधील व्यापार २०१८ मध्ये १.७६ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. व्हिक्टोरियाच्या वित्तीय क्षेत्रात १ लाख २२ हजार कर्मचारी काम करत आहेत. या क्षेत्रामधून दरवर्षी ४० अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरची संपत्ती निर्माण होते. व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे.