नवी दिल्ली - फिटनेक कंपनी पेटीएमने १ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत वित्तीय आणि संपत्ती व्यवस्थापन सेवेचा पेटीएम विस्तार करणार आहे. त्यासाठी विविध पदाच्या नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार आहे.
पेएटीएम १ हजार अभियंते, डाटा सायन्टिस्ट, वित्तीय विश्लेषक आणि इतर जागांसाठी नोकऱ्या देणार आहे. पेटीएम ही कर्ज, विमा, संपत्ती व्यवस्थापन आणि ऑफलाईन देयक व्यवहाराच्या व्यवसायात आहे. या सेवांचा कंपनी विस्तार करत आहे. नवीन वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञानाच्या सेवांचे लाँचिग करण्यासाठी कंपनीमधील टीमचा विस्तार करणे महत्त्वाचे असल्याचे पेटीएमने म्हटले आहे. कंपनी दिल्ली, मुंबई, बंगळरूमधील विविध पदासाठी नियुक्त्या करणार आहे. तर वरिष्ठ कार्यकारी आणि उपाध्यक्षपदाच्या जागांवर ५० जणांची नियुक्ती करणार आहे.
कंपनीने एप्रिलमध्ये ५०० जणांना नोकऱ्या देण्याचे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता कंपनीने गेल्या चार महिन्यांत ७०० जणांना नोकऱ्या देणार असल्याची माहिती दिली आहे. टाळेबंदीतही मुलाखती आणि नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू सअल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही. तसेच वेतन कपात केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.