नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने रेल्वेच्या माध्यमातून वाहनांची वाहतूतक करत मोठ्या प्रमाणात इंधन बचत केली आहे. कंपनीने गेल्या सहा वर्षात 6.7 लाख वाहनांची रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक केली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून मारुतीने प्रथम मार्च 2014 मध्ये वाहनांची वाहतूक केली होती. गेली सहा वर्षे रेल्वेच्या माध्यमातून केलेल्या वाहतुकीमुळे सुमारे 3 हजार मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर 100 दशलक्ष लिटर इंधनात बचत झाली आहे. या वाहतुकीमुळे कंपनीच्या महामार्गांवरील ट्रकच्या 1 लाख फेऱ्या वाचू शकल्या आहेत.
मागील आर्थिक वर्षात रेल्वेमधून 1.78 लाख वाहने पोहोचविण्यात आले आहेत. हे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढले आहे. वाहनांची रेल्वेतून वाहतूक करण्याचे महत्त्व मारुती सुझुकी इंडियाचे सीईओ केनिची आयुकावा यांनी सांगितले. ते म्हणाले, की वाहनांचे उत्पादन वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकची गरज आमच्या टीमला वाटत होती. रेल्वेच्या माध्यमांतून वाहनांची वाहतूक केल्याने रस्ते मार्गावरून होणारा धोका कमी झाला आहे.