नवी दिल्ली - विप्रोचे संस्थापक, प्रसिद्ध दानशूर अझीम प्रेमजी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी जूलैअखेर निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अझीम यांनी कौटुंबिक तेलाचा उद्योग विस्तार करत ८५० कोटी डॉलरची उलाढाल असलेली सॉफ्टवेअर कंपनी उभारली. या विप्रो उद्योगाची धूरा त्यांचे चिरंजीव रिशद हे सांभाळणार आहेत.
प्रेमजी हे पुढील महिन्यात ७४ वर्षांचे होणार आहेत. ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून ३० जूलै २०१९ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांनी कंपनीचे ५३ वर्षे नेतृत्व केले आहे.
जाणून घ्या रिशद यांच्याविषयी-
रिशद अझीम हशम प्रेमजी हे विप्रोचे चिफ स्ट्रेटजी ऑफिसर म्हणून मे २०१५ पासून जबाबदारी सांभाळत आहेत. तर कंपनीच्या संचालक मंडळावर २०१८ ला नियुक्त झाले आहे. त्यांनी अमेरिकेतील वेसलियान विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतला आहे. तर प्रसिद्ध अशा हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीचे चेअरमनपदही भूषविले आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर उद्योगाची शिखर संघटना आहे.
अझीम प्रेमजी यांची वाटचाल-
अझीम प्रेमजी यांनी १९६६ मध्ये स्टॅनफॉर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतला आहे. त्यानंतर त्यांनी घरातील परंपरागत तेल उद्योगाच्या सूत्रे हाती घेतली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले.
कंपनीने केले फेरबदल-
विप्रो संचालक मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अब्दाली झेड. नीमुचवाला यांच्या पदात बदल केला आहे. त्यांना कार्यकारीऐवजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे. तर रिशद यांची पूर्णवेळ संचालक म्हणून निवड केली आहे. ते ३० जुलै २०२४ पर्यंत पदावर राहणार आहेत. त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
अझीम यांनी कर्मचाऱ्यांना दिला संदेश-
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात अझीम यांनी मुलगा रिशदबद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, रिशद हा कंपनीला नव्या मोठ्या उंचीवर नेईल. तुमच्यासोबत रिशद आणि आबिद हे कंपनीचे परिवर्तन घडवतील, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूप दीर्घकाळाचा आणि समाधानकारक होता, असे त्यांनी निवृत्तीबाबत म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशातून रिशद यांनी अशी दिली प्रतिक्रिया
लोक हेच सामर्थ्य असलेल्या विप्रोचे भविष्य उज्जवल असल्याचे रिशद यांनी कमर्चाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, की प्रेमजी यांनी गेल्या ५३ वर्षात छोट्या उद्योगातून विप्रो ही जागतिक पातळीवरील यशस्वी आणि कौतुकास्पद संस्था उभारली आहे. त्यांचे योगदान आणि यश हे विप्रोच्या यशापलीकडे आहे. ते आयटी उद्योगाचे जगभरातील नेतृत्व आहेत. भारतीय उद्योगाची त्यांनी रचना बदलली आहे. बांधिलकीतून यश मिळवता हे त्यांनी दाखवून दिले आहे. ते निवृत्त होत असताना त्यांनी आपल्या हातात थोर वारसा दिला आहे. त्यांना धन्यवाद म्हणणे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विप्रोला नव्या उंचीवर नेणे
हा एकमेव मार्ग आहे. एकत्रितपणे नव्या मार्गाची आखणी करून नव्या आघाड्यांवर विजयी झाले पाहिजे.
अझीम आहेत देशातील सर्वात मोठे दानशूर-
अझीम यांना पद्मभुषण आणि पद्म विभूषण पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक कार्याला अधिक योगदान देण्याचा अझीम यांनी निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये त्यांनी ५२ हजार ७५० कोटींचे शेअर सामाजिक कार्याला दान केले आहेत. त्यामुळे देशाच्या इतिहासातील ते सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत.
कंपनीचे ३४ टक्के शेअर असलेले प्रेमजी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. शिक्षण क्षेत्रासह विविध विषयात काम करणारी अझीम प्रेमजी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. त्यांनी आजपर्यंत एकूण १.४ लाख कोटींचे दान समाजसेवेसाठी दिले आहे.
अशोक गांगुली हे विप्रोचे स्वतंत्र संचालक आहेत. ते म्हणाले,रिशद यांच्याकडे जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान उद्योगाचे ज्ञान, सामर्थ्यवान रणनीती आणि नेतृत्वात वैविध्यपूर्ण अनुभव आहेत. यामुळे ते विप्रोला दिशा देणारे योग्य व्यक्ती आहेत. तसेच ते कंपनीचे हित आणि समभागधारकांच्या मुलभूत सामाजिक दृष्टीकोनाचे योग्य प्रतिनिधीत्व करण्यासाठी उत्कृष्ट व्यक्ती आहेत.