हांग्जो (चीन) - ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी असलेल्या अलिबाबांनी 'सिंगल्स' म्हणजे ११ नोव्हेंबरच्या ऑनलाईन खरेदी महोत्सवात नवा विक्रम नोंदविला आहे. एकाच दिवसात अलिबाबाच्या वेबसाईटवरून ३८.३८ अब्ज डॉलर (सुमारे २ लाख ६६ हजार कोटी) किमतीच्या वस्तुंची विक्री झाली आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध आणि मंदावलेली अर्थव्यवस्थेतही अलिबाबाने ही कामगिरी केली आहे.
अलिबाबा ग्रुपच्या विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये केवळ २९ मिनिटे ४५ सेकंदात एकूण १० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तुंची विक्री झाली आहे. अलिबाबाने आयोजित केलेल्या शॉपिंग महोत्सवात २४ तासात ३८.३७९ अब्ज डॉलरची उलाढाल झाली आहे. अलिबाबाच्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत व्यवसायात २५.७ टक्के व्यवसायाची वृद्धी झाली आहे. चीन-अमेरिकेमधील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर या आंतरराष्ट्रीय खरेदी महोत्सवाकडे (ग्लोबल शॉपिंग फेस्टिव्हल) जगभराचे लक्ष लागलेले होते.
हेही वाचा-' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'
ग्राहकांच्या संख्येत आणि नव्या विक्रीत वेगवान वृद्धी कंपनीने टिकविली आहे. ग्राहकांची चांगली मागणी ही अर्थव्यवस्थेला पुढे नेत असल्याचे टाओबाओ आणि टीमॉलचे अध्यक्ष फॅन जिआंग यांनी सांगितले.
काय आहे सिंगल्स डे?
अलिबाबाची टीमॉल ही चीनमधील सर्वात मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे. यामध्ये चीनमधील तसेच आंतरराष्ट्रीय नाममुद्रा (ब्रँड) आणि किरकोळ विक्रेते सहभागी होतात. टाओबाओ ही चीनची आघाडीची शॉपिंग वेबसाईट अलिबाबाच्या मालकीची आहे. हा महोत्सव 'डबल ११' म्हणूनही ओळखला जातो. कारण ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा खरेदी महोत्सव संपतो. या महोत्सवाला 'सिंगल्स डे' म्हणून ओळखले जाते. कारण ११/११ या दिवशी चारवेळा एक हा अंक येतो. हा जगातील सर्वात मोठा खरेदी महोत्सव म्हणून वेगाने वाढला आहे. विविध कंपन्यांनी त्यांची सुमारे १० लाख नवीन उत्पादने खरेदी महोत्सवात विक्रीला आणली होती.
हेही वाचा-मंदीचे ग्रहण सुटेना! औद्योगिक उत्पादनाच्या दरात ४.३ टक्के घसरण
खरेदी महोत्सवात हायर, हुवाई, शिओमो, आदिदास आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ११.११ (११ नोव्हेंबर) या खरेदी महोत्सवात रशिया, हाँगकाँग, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान देश सहभागी झाले होते.