सॅनफ्रान्सिस्को- जगात सर्वाधिक कामाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या गुगलमधील कर्मचाऱ्यांची कैफियत समोर आली आहे. गुगलमधील 500हून अधिक कर्मचाऱ्यांनी अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पत्र लिहून छळवणूक करणाऱ्यांना संरक्षण देऊ नये, अशी मागणी केली आहे. छळवणूक करणाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मुक्त वातावरण उपलब्ध करावे, अशीही या कर्मचाऱ्यांनी पिचाई यांच्याकडे मागणी केली आहे.
गुगलच्या महिला अभियंता एमी नीटफेल्ड यांनी अमेरिकेमधील वर्तमानपत्रात लेख लिहून छळाबद्दलची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, छळ करणाऱ्या माणसांसमोरच कामाच्या ठिकाणी दबाव टाकून बसविण्यात येत आहे. त्या माणसाचा डेस्क बदलण्यासाठी एचआर काहीही करू शकत नसल्याचे सांगण्यात आले. घरातून काम करा किंवा सुट्टीवर जा असा सल्ला देण्यात आल्याचेही एमी यांनी लेखात म्हटले आहे. अल्फाबेटमध्ये ज्या व्यक्तीचा छळ होतो, त्याला संरक्षण देण्याऐवजी छळवणूक करणाऱ्यांना संरक्षण दिले जाते. तक्रार देणाऱ्याला त्रास सहन करावा लागतो. तर त्रास देणाऱ्याला त्याच्या वागणुकीसाठी बक्षीस दिले जाते असे गुगलच्या कर्मचाऱ्याने पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-जॅक मा यांना पुन्हा चीन सरकारचा दणका; अलिबाबाला ठोठावला 2.8 अब्ज डॉलरचा दंड
छळ करणाऱ्यांना गुगलकडून बक्षीस दिले जात असल्याचा आरोप-
अँड्राईड मोबाईल सॉफ्टेअरचे निर्माते अँडी रुबीन यांना 90 दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्यात आले. त्यांच्याविरोधात महिला कर्मचारीने शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. सर्च एक्झयुटिव्ह अमित सिंगल यांच्याविरोधातही महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यांना कंपनीने 35 दशलक्ष डॉलरचे बक्षीस दिल्याचा आरोप एमी नीटफेल्ड यांनी केला आहे. अल्फाबेटमधील 20 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळाविरोधात निदर्शने केली होती. तरीही अल्फाबेट कंपनी बदलेली नाही, असा आरोपही एमी नीटफेल्ड यांनी लेखात केला आहे.
दरम्यान, यापूर्वी गुगलने कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
हेही वाचा-टेक्नो स्पार्क 7 भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये