मुंबई - सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची कोठडी हवी आहे. राणा यांचा ४ हजार ३०० कोटी रुपयांचा काळा पैसा व मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सहभाग असल्याचे ई़डीला प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
राणा कपूर यांना तीन दिवसाची कोठडी (११ मार्चपर्यंत) सुट्टीकालीन न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी सुनावली आहे. त्यानंतर काही तासानंतर रविवारी राणा यांची मुलगी रोशनीने विमानाने लंडनला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ईडीच्या प्रयत्नामधून रोखण्यात आले. कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात लूक आऊट नोटीस बजाविल्याने त्यांना विदेशात प्रवास करण्यावर मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा-येस बँक प्रकरण : सीबीआयकडून मुंबईत 7 ठिकाणी छापे
कपूर यांच्या तीन मुलींची मालकी असलेल्या डोल्ड व्हेंचर्स इंडिया प्रा. लि (डीयूव्हीआयपीएल) कंपनीला ६०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. दिवाण हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल), कपिल वाधवान आणि इतरांना कर्ज देताना अनियमितता असल्याचा ईडीला आढळून आले आहे. सूत्राच्या माहितीनुसार येस बँकेने डीएचएफएलचे ३,७०० कोटी रुपयांचे रोखे एप्रिल-जून २०१८ दरम्यान घेतले आहेत. तर डीएचएफएलने कपूर यांच्या मुलींची कंपनी डीयूव्हीआयपीएलला ६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. या कंपनीत राधा कपूर-खन्ना, राखी कपूर-टंडन आणि रोशनी कपूर या तिन्ही मुलींचा एकत्रित १०० टक्के हिस्सा आहे.
हेही वाचा-कोरोना भयग्रस्त बाजारात १,९४१ अंशांनी पडझड; गुंतवणूकदारांना गमावले ७ लाख कोटी
येस बँकेने डीएचएफएल ग्रुपला दुसरे ७५० कोटींचे कर्ज मंजूर केले. त्यासाठी डीएचएफएलने डीयूव्हीआयपीएल कंपनीची जमीन गहाण ठेवली. ही शेतजमीन केवळ ४० कोटी रुपयांची असताना त्याचे मूल्य ७३५ कोटी रुपये दाखविल्याचे ईडीतील सूत्राने सांगितले. केंद्रीय गुन्हे अन्वेशषण विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने कपूर आणि इतरांविरोधात पहिले आरोपपत्र ७ मार्चला दाखल केले आहे.