मुंबई - अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने एच १ -बी व्हिसा देण्याचे कठोर नियम लागू केल्याचा आर्थिक फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयटी कंपन्यांना सुमारे ०.८० टक्क्यापर्यंत नफा कमी होईल, असे क्रिसीलने म्हटले आहे.
आयटी क्षेत्राचा महसूल डॉलरमध्ये ७ ते ८ टक्क्याने वाढून १८ हजार कोटीहून अधिक वाढणार असल्याचा अंदाज क्रिसील या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे. अमेरिकेने व्हिसाचे नियम कठोर केल्याने कंपन्यांना स्थानिक मनुष्यबळ सेवेत घ्यावे लागणार आहे. याचा परिणाम म्हणून कंपन्यांच्या नफ्यात ०.३० ते ०.८० टक्क्यापर्यंत घट होईल, असे क्रिसीलने म्हटले आहे.
अमेरिकन सरकारने एच-१ बी व्हिसाचे नियम २०१७ मध्ये कठोर नियम केले आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांचा कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढत आहे. एच-१ बी व्हिसाचा सर्वात अधिक ६३ टक्के भारतीय वापर करतात. हा व्हिसा घेणारे कर्मचारी स्थानिक कर्मचाऱ्यांहून २० टक्के कमी पगारात उपलब्ध होतात. व्हिसाच्या नियमातून झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना सेवेत घ्यावे, असे क्रिसीलने म्हटले आहे.