संयुक्त राष्ट्रसंघ - जगभरात कुपोषणमुक्तीसह इतर महत्त्वाचे कार्यक्रम राबविणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची वित्तीय तूट २३० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचल्याचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी सांगितले. चालू महिनाअखेर संयुक्त राष्ट्रसंघाकडील पैसे संपणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
एंतोनियो यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक स्थितीबाबत ३७ हजार कर्चमाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये त्यांनी वेतन आणि इतर कामे करण्यासाठी पावले उचलली असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले आहे.
चालू वर्षात काम करण्यासाठीच्या अर्थसंकल्पात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी केवळ ७० टक्के निधी दिला आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर २३० दशलक्ष डॉलरची संयुक्त राष्ट्रसंघाला कमतरता पडली आहे. त्यामुळे महिनाअखेर निधी संपणार असल्याची भीती एंतोनियो यांनी पत्रात व्यक्त केली.
खर्चात कपात करण्यासाठी परिषद व बैठका टाळण्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना पत्रातून आवाहन केले आहे. तसेच उर्जेत कपात करावी व कार्यालयीन प्रवास केवळ महत्त्वाच्या कामासाठी करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक स्थितीला शेवटी सदस्य देशच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाला देण्यात येणाऱ्या निधीचे प्रमाण वाढवावे, अशी गुतारेस यांनी सदस्य राष्ट्रांना विनंती केली होती. मात्र, सदस्य राष्ट्रांनी त्याला नकार दिल्याचे सूत्राने सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाचे आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ५.४ अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प होता. त्यासाठी अमेरिकेने २२ टक्के निधी दिला आहे.