नवी दिल्ली - इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी टेस्ला पुढील वर्षी भारतात काम सुरू करणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मागणी प्रमाणे उत्पादन सुरू करण्यावर टेस्ला विचार करत असल्याचेही गडकरी यांनी यांनी सांगितले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पर्यावरणपूरक इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे देशाच्या आयातीच्या बिलात ८ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. पुढे नितीन गडकरी म्हणाले, की टेस्ला कारच्या वितरणाची पूर्ण यंत्रणा पुढील वर्षापासून भारतात असणार आहे. जगामधील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक देश होण्याची भारतामध्ये क्षमता आहे.
हेही वाचा-ठरलं! टेस्लाची कार पुढील वर्षी भारताच्या बाजारपेठेत होणार दाखल
भारतीय बाजारपेठेत २०२१ मध्ये प्रवेश करेल, असे टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विट करून म्हटले होते.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने टेस्ला कंपनीला पुण्याजवळील चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला होता.
हेही वाचा-टेस्ला प्रकल्प सुरू करण्याकरता राज्य सरकारचे निमंत्रण; उद्योग मंत्र्यांची कंपनीबरोबर चर्चा
काय म्हटले होते मस्क यांनी?
मस्क यांनी यापूर्वी भारतात इलेक्ट्रिक कार आणण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारच्या काही नियमांमुळे देशात कार आणण्यासाठी अडचणी असल्याचे मस्क यांनी २०१८मध्ये म्हटले होते. तसेच केंद्र सरकारच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमातील किचकट प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली होती. चालू वर्षात जुलैमध्ये मस्क यांनी टेस्लाच्या भारतीय चाहत्यांसाठी इलेक्ट्रिक मॉडेल लवकरच उपलब्ध करू, असा विश्वास व्यक्त केला होता.