पणजी – टाळेबंदी 1 खुली झाल्यानंतर गोवा सरकारने पर्यटन व्यवसायालाही परवानगी दिली आहे. देशात पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने किनारपट्टीलगत असलेल्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
गोवा सरकारने देशातील पर्यटकांसाठी 250 हॉटेल सुरू करण्याची गुरुवारी परवानगी दिली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की पर्यटन हा गोव्यातील सर्वात मोठा उद्योग आहे. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. टाळेबंदी खुली होण्याच्या टप्प्यात आम्ही अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभमीवर आरोग्याच्या सुरक्षिततेकरता निकषांचे पालन करण्यात येणार आहे.
गोवा पर्यटन विभागाच्या माहितीनुसार पर्यटकांना राज्यात येण्यापूर्वी राहण्यासाठी बुकिंग करणे बंधनकारक आहे. तर केवळ देशातील पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पर्यटकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागणार आहे. कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसेल तर, राज्यात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांची चाचणीचा करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित पर्यटकाला त्यांच्या राज्यात परतण्याचा पर्याय असणार आहे. अशा पर्यटकांवर गोव्यातही उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कोरोनाचा देशातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गोवा सरकारला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात पर्यटनाचा सिंहाचा वाटा असतो. विदेशी पर्यटक हे देशात सर्वाधिक गोवा राज्याला भेट देतात.