नवी दिल्ली - एच-१ बी व्हिसातील बदल हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि नोकऱ्यांना हानिकारक असल्याची प्रतिक्रिया उद्योगांची संस्था नॅसकॉमने दिली आहे. अमेरिकेच्या गृहविभागाने एच-१बी व्हिसामध्ये बदल जाहीर केले आहेत. या बदलाने बुद्धिवान कुशलतेवरही बंधन येणार असल्याचेही नॅसकॉमने म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाने नव्याने एच-१ बी विना स्थलांतरित व्हिसावर निर्बंध लागू केले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक लढविणाऱ्या ट्रम्प यांनी या बदलाने स्थानिक कामगारांच्या हक्काचे संरक्षण होत असल्याचा दावा केला आहे. व्हिसाच्या नियमातील बदलाने एच-१ बी हा व्हिसा केवळ योग्य लाभार्थींना मिळेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना फटका बसणार आहे.
नॅसकॉमने ही दिली आहे प्रतिक्रिया-
एच-१ बी व्हिसामधील बदल हे अमेरिकेच्या हिताला धोकादायक आहेत. तसेच कोरोनाच्या संकटात संशोधन आणि विकासावर परिणाम होणार असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे. अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभाग आणि कामगार विभागाने एच-१बी व्हिसातील बदलाची अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये कर्मचारी व कंपनी आदी व्याख्या बदलण्यात आली आहे. तृतीय पक्षाकडून देण्यात येणाऱ्या नोकऱ्यांसाठी एच-१बी व्हिसाची वैधता ही एका वर्षासाठी करण्यात आली आहे.
चुकीच्या माहितीवर आधारित व्हिसाचे नियम करण्यात आल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे. अमेरिकेत जानेवारी २०२० मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ४.१ टक्के होते. हे प्रमाण वाढून ऑगस्ट २०२० मध्ये ८.४ टक्के झाले आहे. दुसरीकडे कॉम्प्युटर क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण हे ३ टक्क्यांवरून २.५ टक्के कमी झाले आहे.
काय आहे एच १बी व्हिसा-
अमेरिकन कंपन्यांकडून स्थलांतरित नसलेल्या विदेशातील कर्मचाऱ्यांना एच१बी व्हिसा देण्यात येतो. विशेषत: तांत्रिक गोष्टीत तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना एच १बी व्हिसा देण्याचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील अनेक तंत्रज्ञान कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीत घेण्यासाठी चीन आणि भारतातील मनुष्यबळावर अवलंबून असतात.